ठाणे जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल होतायत. कमीतकमी वेळात फिरण्याची ठिकाणं भटकंतीप्रेमींना हवीच असतात. त्याच लिस्टमधलं रिफ्रेश करणारं ठिकाण म्हणून अर्नाळ्याचं नाव आहे. होडीतला आनंद, बिचवरची मजा, ऐतिहासिक वास्तू, तसंच मासेखाऊंसाठी मेजवानीचं ठिकाण म्हणजे अर्नाळा.
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतून उमग पावलेली वैतारणा नदी याच अर्नाळा किल्ल्याच्या खाडीमुखाशी मिळते. इथे वैतरणा खाडीमुखाशी भर सागराच्या कुशीत वसलेल्या या अर्नाळा किल्ल्याने आपलं स्वतंत्र अस्तित्व जपलंय.
अर्नाळा गाठायला पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून १४ किमीवर अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे. किंवा वसईहूनही अर्नाळ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.
अर्नाळा बस स्थानक ऐन बाजारपेठेत असल्याने खाण्याची उत्तम सोय होते. बाजारातून मासळीचा वास घेत किनारा गाठायचा. किनाऱ्यावर कोळणी मासे विकताना, तर पुरुष कावड घेऊन बर्फ, मच्छीची वाहतूक करताना दिसतात.
किनाऱ्यावरून अर्नाळा बेटावर जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला फेरी बोट उपलब्ध आहे. साधारण पंधरा-वीस मिनिटात अर्नाळा बेट गाठता येतं. संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा. वाटेतच कोळ्यांची जाळी, होडीचे नांगर, सुकत टाकलेली मच्छी, खार लावलेली मच्छी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात.
अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्य्र आणि हत्ती यांची सुबक शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर वेली-फुलांची बुट्टी आपल्याला खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमधे शके १६५९ मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो.
मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच गडाचं रूप खुलून दिसतं. सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूवेर्च्या तटाजवळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथे समोर गोड्या पाण्याचा तलाव बांधून घेतलेला आहे. तर तटांवर उत्खननात सापडलेल्या गणेशाच्या मूतीर्ची स्थापना केलेली आहे. इथूनच मागे वळून तटाच्या आतील बाजूने तटांवर जाण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटांवरच्या फेरीस सुरुवात करायची. एकूण नऊ बुुरूज असलेला आणि तीन प्रवेशद्वार असलेला हा किल्ला इतिहासात स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून आहे.
या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. १५१६ मधे केली. पुढे १५३० मधे हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर १७३७ मधे मराठ्यांनी जिंकला. या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं. असे दाखले इतिहासात सापडतात. बेटावर असलेल्या कालिका मातेचं दर्शन घायचं आणि पुन्हा किनारा गाठायचा.
निसर्गाच्या सान्निध्यातले दोन दिवस घालवून नव्या जोमाने कामाला लागू शकतो.