ग्लोबलायझेशननंतर शहरीकरण झपाट्याने झालं आणि गावांची बकाल शहरं होऊ लागली. कोणत्याही नियोजनाशिवाय विकासाच्या नाव
ाखाली सिमेंटच्या जंगलांनी शेतजमिनींचा बळी जाऊ लागलाय. यावर ना कुणाचं नियंत्रण आहे ना कसले नियम... हे गाव अशा हजारो गावांचं प्रतिनिधित्व करणारं... माती हरवलेलं.
गाव तालुक्याचं नसलं तरी मोठं, बाजारपेठेचं. स्टॅण्डवर उतरून भरून वाहणारा पुणे-नाशिक रस्ता ओलांडला, की आपट्याचं पट्टी शेत. खरं तर बसस्टॅण्डची इमारत उभी राहिली या शेतातच. लांबूनच सीताआत्याचं घर दिसायचं. तिथे जरा टेकून चहापाणी झालं, की मळ्याकडे चालू लागायचं. हा फारतर पंधरावीस मिनिटांचा रस्ता. दोन्ही बाजूला शेतं. दिवाळीला गेलं, की डोक्यापर्यंत आलेली गच्च बाजरी दिसायची. पुढे हरणमुखाची शेतं. जरा हलकी. त्यात कडधान्य पसरलेली. मूग निघालेला असायचा. घरासमोरच्या अंगणात बढेमामा शेंगांचं वाळवण घालून बसलेले दिसायचे. दारातल्या शेळीला चारा टाकत सरसआत्याची 'आलीस का गं?' म्हणत जिव्हाळ्याने चौकशी. पुढे खरमाळ्यांची माडी. परिसरातली एकमेव. रंगीत बेल्जिअम काचांच्या त्या खिडक्यांचं लहाणपणी आकर्षण वाटायचं खूप. माडीशेजारी विहीर. भरपूर गोड्या पाण्याची. आजूबाजूच्या सगळ्या बायाबापड्या इथून पाणी भरायच्या. नळाचं पाणी गावापुरतं. इथे अजून ते सुख नव्हतं. सदासर्वकाळ रहाट वाजत राहायचा. तिथे मोट पाहिल्याचंही आठवतंय. त्यांच्या शेतात भाजीपाला, वगैरे. रस्ता आमच्या घरावरून पुढे मुळे वस्तीत जायचा. खाली कडूलिंबाची गच्च झाडं. चुलत्यांची शेतं, विहीर. भरपूर पाणी असलेला ओढा. काठाशी सीताफळांनी गच्च लगडलेली असंख्य झाडं. पायाशी बोरांचा सडा पडलेल्या बोरी. थोरातांची फळबाग. वस्तीपासून थोडं लांब त्यांचं घर...
काळाबरोबर धावताना गाव मागे पडलं तरी हेच चित्र मनावर घट्ट कोरलेलं. सुट्टीत जाणं व्हायचं. प्रत्येक वेळी झालेले बदल जाणवायचे. सगळ्यात आधी आपट्याच्या पट्टीत वडिलांनी घर बांधलं. जवळच बाजारसमितीची इमारत उभी राहिली. हॉटेलं झाली. बार झाले. रस्त्याच्या पलीकडचं गाव रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वाढू लागलं. हळूहळू शेतातली हिरवाई दिसेनाशी झाली. बाजरीच्या ताटांऐवजी आरसीसीचे पिलर्स दिसू लागले. रस्त्याच्या कडेला शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि थोडं आतल्या बाजूला हाऊसिंग सोसायट्यांची नावं मिरवणाऱ्या इमारतींनी शेतजमीन गिळून टाकली. नवश्रीमंतांच्या बंगल्यांच्या झोकदार कॉलन्या उभ्या राहिल्या. आजूबाजूच्या गावातले नोकरदार, शिक्षक, कामगार कुटुंबकबिल्यासह स्थिरावले. त्यांच्यासाठी अॅस्बेस्टॉसच्या पत्र्याच्या लांबलचक चाळी उभ्या राहिल्या. शेजारच्या तालुक्यातल्या एमआयडीसीत कामगार घेऊन जाणाऱ्या झोकदार बसेस दिसू लागल्या. वाढत्या गरजांना पुरं पडण्यासाठी जमेल तसं, जमेल तिथे गाव वाढू लागलं. घरापासून कॉलेजपर्यंत सुनसान वाटणारा रस्ता आता दोन्ही बाजूंना दिमाखदार इमारती घेऊन नांदता झाला. एकेकाळी गर्द हिरव्या झाडीत लांबूनही सहज ओळखू येणारी कॉलेजची टुमदार इमारत हळूहळू हरवत जाऊन दिसेनाशी झाली.
शेतकरी मात्र खुशालले होते. आधी एकरांवर चाललेली विक्री आता गुंठ्यांवर आली. हजारांत होणारे व्यवहार लाखांत होऊ लागले. रजिस्ट्रारच्या ऑफिसात नंबर लागेना. तुकड्यातुकड्यांनी शेतजमिनीचा बळी पडत राहिला. औत, नांगर दिसेनासे झाले. ज्या घरांत पोत्यांच्या राशी लागत तिथे महिन्याच्या किराण्याच्या यादीत पावशेर मूगही लिहिले जाऊ लागले. गाई गुरं आधीच बाजारात गेली होती. आता गाड्यांच्या शर्यतींच्या हौसेपोटी ठेवलेल्या बैलजोड्या फक्त राहिल्या. खादीच्या पांढऱ्याधोप कपड्यात मनगटावर, गळ्यात सोन्याच्या अवजड साखळ्या ल्यायलेली तरुण पोरं चौकात बाइकवरून उंडारू लागली. एकरभर शेत विकलं की महिंदची चकचकीत एसी गाडी दाराशी झुलू लागली.
चार सहा महिन्यांच्या गॅपने गावी जावं, तर जुन्या खुणा पुसून नवं काही तरी उभं राहिलेलं असायचं. घरापर्यंतच्या रस्त्यावर अनोळखी चेहरे वाढू लागले. मध्यंतरी एक मॉलही उभा राहिला. दहा वर्षांपूवीर् आठ हजार लोकवस्तीचं गाव आता पंचवीस हजारांचा आकडा ओलांडून गेलं. दुसऱ्या राज्यांतून आलेल्या तीन हजार जणांनी तिथे कायमचं बस्तान बांधलंय. चार हजार एकरांवर होणारी शेती दोन हजार एकरावर आलीय. डेवलपर नावाची जमात जोरात आहे. एजण्ट्सचं पिक आलंय.
गाव वाढतंय. सुजल्यासारखं. त्याला कसलं नियोजन नाही, कुणाचं नियंत्रण नाही. दोन इमारतींमधे फूटभर जागाही नाही. कधी काही अघटीत घडलं तर काय, याचा विचार नाही. प्यायला पुरेसं पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी भुतासारखं पहाटे उठायचं. जमिनीला भोकं पाडून पाण्यासाठी हजारो बोअर घेतलेत. सांडपाणी रस्त्यावर. घोंगावणारे डास, माशा. दर पावसाळ्यात ठरवल्यासारख्या साथी येतात. दवाखाने फुल्ल होतात. डेंग्यू, मलेरिया कायमचे पाहुणे. महामार्गावरचं गाव म्हणून एड्सचं बस्तान. टुमदार गावाचं बकाल शहर होताना असहायपणे बघणं एवढंच हातात उरलंय.
या दिवाळीत गावी गेले होते. पाडव्याचा दिवस. सकाळीच बाहेर पडलेला भाऊ दुपारी उशिरा परत आला. बरीच भूमीपूजनं आणि उद्घाटनं उरकून आलो म्हणाला. या वषीर् गावात तीन हजार नवे फ्लॅट्स तयार होताहेत, तो उत्साहाने सांगत होता. गावपण कधीच हरवलेल्या माझ्या गावाची मग आणखीनच काळजी वाटू लागली.
जगणं घडवायला शहरात गेलेली माणसं मातीच्या ओढीने पुन्हा गावात परततात म्हणे. ज्या गावात मातीच उरली नाही अशा गावाचं आता काय करायचं, हा प्रश्न तेव्हापासून छळतोय....
- प्रगती बाणखेले