-
शांत आणि खळखळ नाद करत जाणारी नदी हे खडावलीचं मुख्य आकर्षण. नदीचा मंद खळखळाट आणि गार वाऱ्याची झुळूक मनाला उभारी देते. ठाण्यापासून एक तासाच्या अंतरावर असलेलं 'खडावली' गाव रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी चांगला पिकनिक स्पॉट आहे.
.......
' जिथे शांतता निवारा शोधत येते
अशा एका तळ्याकाठी बसावेसे वाटते! '
कवी अनिल यांच्या या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर ठाणे जिल्ह्यातल्या खडावलीला एकदा भेट द्यायलाच हवी. गावातून वाहणारी नदी हे इथलं मुख्य आकर्षण. मंद खळखळाट करत वाहणाऱ्या नदीचं चमचमतं पात्र पाहिलं की एखादी अल्लड लहानगी दुडूदुडू धावत, डोळे मिचकावत आपल्याला बोलावते आहे असं वाटतं. नदीच्या किनारी वाऱ्याची थंड झुळूक स्पर्शून जाते. तिचा स्पर्श आणि नदीचा सूरमयी नाद आपल्याला आकषिर्त करतात. एका क्षणात मनाला आलेला थकवा निघून जातो. मनावर साचलेली धूळ उडून जाते. निसर्गाच्या जादूने आपण मंत्रमुग्ध होतो... रोज ट्रेन पकडायची, गदीर्चे धक्के सहन करायचे... या रूटीनला कंटाळलेल्या मंडळींसाठी 'रिचार्ज' होण्यासाठी खडावली हे उत्तम ठिकाण आहे.
पूवीर् या गावात खूप खड्डे होते म्हणून त्याला 'खड्डावली' म्हणू लागले. नंतर ते 'खडावली' झाल्याचं सांगितलं जातं. इथल्या नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दूरहून पर्यटक खडावलीला भेट देतात. नदीचा किनारा सोपा असून त्याची रचना सपाट खडकांची आहे. ही नदी शांत आणि उथळ असल्याने मुलांपासून, महिला आणि वृद्ध नदीत डुंबण्याचा आनंद घेऊ शकतात. तसंच किनाऱ्यावर चहा, भजी आणि वडापाव यांची छोटी टपरीवजा दुकानंही आहेत. पाण्यात मनसोक्त डंुबून हुडहुडी भरली की गरमागरम भजी खाण्याचा आणि सोबत कटिंग चहा पिण्याचा आनंद काही निराळाच असतो.
शांत वाहणाऱ्या नदीच्या किनारी स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे. इथल्या शांततेवर एक अध्यात्मिक अस्तर असल्यासारखं वाटतं. मठातला गारवा शांतता अधिक गहिरी करतो. टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेतल्यावर अनेक भाविक या मठात येतात. भाविकांना मठात ध्यानधारणा किंवा नामस्मरणही करता येतं. खडावलीच्या वेशीवरच हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान हे शक्तीचं दैवत असल्याने गावाचं रक्षण करण्यासाठी वेशीवरच हे मंदिर बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. या परिसरात दत्ताचंही छोटसं, सुंदर मंदिर आहे. हे मंदिरही पाहण्यासारखं आहे.
कसलेल्या गायकाने शांत, मंद गाणं गावं तशी खडावलीची नदी मंजुळ नाद करत वाहत असते... सगळ्या चिंता नदीच्या पात्रात काही वेळापुरत्या सोडून एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे किनाऱ्यावर बसून राहावं... शांततेचा उपभोग घेत!
....... .........
* इथे कसं पोहोचाल?
खडावली हे मध्य रेल्वेवरचं कसाऱ्याकडे जाताना टिटवाळ्याच्या पुढचं स्टेशन. इथे कसारा किंवा आसनगाव ट्रेनने जाता येतं. वाहनाने जायचं झाल्यास कल्याणहून टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्यावरून खडावलीला जाता येतं.
* काय काळजी घ्याल?
नदीचं पात्र किनाऱ्याजवळ शांत आणि उथळ असलं तरी काही ठिकाणी ते खोल आणि धोकादायक आहे. त्यामुळे पोहण्यासाठी जास्त पुढे जाऊ नये. जायचं झाल्यास तिथल्या जाणकार स्थानिकांचा सल्ला घ्यावा. नदीच्या पाण्याचा आनंद घेताना तिथेच कचरा करू नका. पर्यावरणाचा समतोल राखणं हे आपलं कर्तव्य आहे.